महाराष्ट्र ठरलं देशातील सर्वात स्वच्छ राज्य : स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यातील तीन शहरे

टीम AM : भारत सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडचा क्रमांक आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूरनं पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर महाराष्ट्रातील तीन शहरांनी बाजी मारली आहे.

‘सर्वात स्वच्छ शहर’ या श्रेणीत मध्य प्रदेशमधील इंदूर आणि गुजरातमधील सुरत शहराला विजयी घोषित करण्यात आलं आहे. इंदूरनं सलग सातव्यांदा ही किमया साधली आहे. तर महाराष्ट्रातील सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईनं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम व्यवस्था व सुविधा असलेल्या शहराच्या विभागात चंदीगडला पुरस्कार मिळाला आहे. या शहरानं सफाईमित्र सुरक्षित शहर पुरस्कार पटकावला आहे. ‘गंगा शहर’ श्रेणीमध्ये वाराणसीला सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार – 2023 विजेत्यांना प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येचं सर्वात स्वच्छ शहर

सासवड (महाराष्ट्र)

पाटन (छत्तीसगड)

लोणावळा (महाराष्ट्र)