टीम AM : ट्रकचालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. संपामुळे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर बंद आहेत. त्यामुळे पंपापर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोहोचू शकले नाही.
वाहतूकदारांनी 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा संप पुकारला आहे. हिट ॲन्ड रन प्रकरणात केंद्र सरकारने नवा कायदा आणला असून त्यानुसार अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. याविरोधात वाहनचालक आंदोलन करत आहेत. मात्र, हा कायदा सर्व वाहनचालकांना लागू होईल. कार चालकही त्याच्या कक्षेत येणार आहेत.
यादरम्यान, सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यात तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतू, हा दावा केवळ अफवा आहे. असा कोणताही निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला नाही. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने अधिकृतपणे कोणताही संप सुरू करण्याचा किंवा पेट्रोल पंप बंद करण्याचा कोणताही हेतू नाकारला आहे.
पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी कोणताही संप पुकारण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. असा कोणताही संप असोसिएशनने नियोजित केलेला नाही, असे त्यांनी अधिकृत प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे. तसेच नागरिकांना अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.