टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही सतत चर्चेत असते. ती काही मोजक्याच चित्रपटात काम करते. मात्र, तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का करिअरच्या सुरुवातीला विद्या बालन छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात काम करत होती. त्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर आली. हो तुम्ही बरोबर ऐकले. आज 1 जानेवारी रोजी विद्याचा 45 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…
विद्याने 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘परिणिती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यापूर्वी ती ‘हम पांच’ या मालिकेत काम करत होती. या मालिकेत ती राधिका माथूर ही भूमिका साकारत होती. या मालिकेत विद्याची एण्ट्री जवळपास वर्षभरानंतर झाली होती. तो पर्यंत ही मालिका सुपरहिट होती. विद्याच्या आईला देखील ही मालिका प्रचंड आवडायची. सुरुवातीला मालिकेत राधिका ही भूमिका अभिनेत्री अमिता नांगिया करत होती. मात्र, तिने ही मालिका सोडताच विद्याला कास्ट करण्यात आले.
‘हम पांच’ मालिकेनंतर जवळपास एक वर्षांनी विद्याला निर्माती एकता कपूरचा फोन आला. त्यानंतर तिला ‘परिणिती’ हा चित्रपट मिळाला होता. विद्याला या सगळ्यावर सुरुवातीला विश्वासच बसला नव्हता. मात्र, मालिकेने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. आज विद्या ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
‘हम पांच’ या मालिकेत शोमा आनंद, भैरवी रायचूरिया, वंदना पाठक आणि अशोक सराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. 1995 ते 2006 पर्यंत हा शो सुरु होता. हा शो तुफान हिट ठरला होता. या मालिकेनंतर विद्याचे ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ आणि ‘तुम्हारी सुलू’ हे सिनेमे सुपरहिट ठरले होते.