राष्ट्रवादी काँग्रेसचे [शरद पवार गट] लाक्षणिक उपोषण : उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, [शरद पवार गट] केज मतदारसंघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 1 जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, डाॅ. नरेंद्र काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे व सामान्य जनतेच्या प्रश्नामुळे जनता त्रस्त झालेली आहे. तरी राज्य सरकारने विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

‘या’ आहेत मागण्या

◾शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा व अनुदान तात्काळ जमा झाले पाहीजे.

◾25% अग्रीम अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम मिळाले पाहीजे.

◾शेतकऱ्यांचे विज बील माफ करण्यात यावे. तसेच  शेतकऱ्यांच्यासाठी दिवसा अखंडीत विजपुरवठा चालू राहीला पाहीजे व विद्युत ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाल्यावर तात्काळ बदलुन देण्यात यावा.

◾जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात, त्या शेतकऱ्यांना रू. 50,000/- अनुदान खात्यात जमा करा.

◾केज मतदार संघातील व अंबाजोगाई तालुक्यातील सध्या चालु असलेल्या विविध विकास कामांच्या गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

◾अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणामुळे विस्तापीत झालेल्या छोट्या व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करणे

◾केज विधानसभा मतदार संघातील शेतमजुर व बांधकाम मजुर यांच्या राशनकार्डमध्ये त्यांची नावे शेतकरी कुटुंबामध्ये समावेश झालेली आहेत. ती नावे पी.एच.एच. मध्ये समावेश करण्यात यावीत.

◾केज विधानसभा मतदार संघातील सर्व झोपडपट्टी धारकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.