कोरेगाव – भीमा येथे लोटला जनसागर : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची अलोट गर्दी

टीम AM : कोरेगाव – भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा – कोरेगाव येथे दाखल होत भल्यापहाटे विजयस्तंभाला अभिवादन केलं. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.

कोरेगाव – भीमा येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतिक आहे. दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी 1 जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

शौर्यदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव – भीमा परिसरात दाखल झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला आहे.

पोलिसांसह आरोग्य सेवा, वाहतुक, पार्किंग अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मदतीसाठी 3200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 700 होमगार्ड्स आणि ‘SRPF’ च्या 6 तुकड्या तैनात करण्यात आल्यात.

शिवाय आरोग्य सेवेसाठी 29 ठिकाणी आरोग्य कक्ष, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ञ डॉक्टर, 200 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेत. सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजयस्तंभ 75 फूट उंच आहे. त्यासाठी चारही बाजूंनी क्रेनच्या साहाय्याने साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.