टीम AM : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे तयार करणाऱ्या एका कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली होती. या आगीतून सुमारे 15 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर होरपळलेल्या सहा कामगारांना घाटी रुग्णालयात नेण्यात आलं असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हातमोजे बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.