राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

खुर्चीला घातला हार : कार्यालयात जोरदार घोषणाबाजी

टीम AM : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयात हजर रहात नाहीत, विचारलेली माहिती सांगत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) आज आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. 

सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरु आहे. अधिकारी कार्यालयात हजर रहात नाहीत. घरूनच सर्व कामे पहात असल्याने सामान्य माणसांची कामे होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी या सर्व बाबींवर जाब विचारत एक निवेदन दिले होते. परंतू, त्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही. शिवाय आम्हाला उत्तरही दिले नाही. त्यामुळे आज आम्ही कार्यालयात आलो आहोत आणि कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घातला आहे, असे माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी सांगितले. यावेळी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने हजर होते. 

आता हार घातला, पुन्हा… 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात हजर रहावे, जनतेचं ऐकून घ्यावे व त्यासोबतच विचारलेली जनहिताची माहिती वेळेवर द्यावी. अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आता हार घातला आहे, नंतर मात्र चपला घालू, असा इशाराही तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिला आहे.