अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील घटना
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी युवकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराष्यातून आकाश काकासाहेब जाधव [वय 25 रा. तडोळा, ता. अंबाजोगाई] या युवकाने स्वताच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आत्महत्या केली.
आकाश जाधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे प्रेत शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. यानंतर ही वार्ता गावभर पसरली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती बर्दापूर पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. आकाश जाधव याच्या पश्चात वृध्द आई – वडील, भावजई व एक छोटा पुतण्या आहे.
मोठ्या भावानेही दीड वर्षापूर्वी केली होती आत्महत्या
मयत आकाश जाधव याच्या भावाने दीड वर्षापूर्वी शेती पिकत नसल्याने आलेल्या नैराष्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे हे कुटुंब दुःखातून सावरलेले नसतानाच लहान भाऊ असलेल्या आकाश यानेही आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार गमावल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.
मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील दुसरी आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद [वय- 42] यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. त्यानंतर आज आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या आहेत.