टीम AM : समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा मूलमंत्र देणारे आणि प्रत्येक ‘स्त्री’ ला उंच भरारी घेण्यासाठी दिशा दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक स्त्री सुशिक्षित झालीच पाहिजे, असा आग्रह धरून, समाजाचा विरोध पत्करून हाती घेतलेलं काम पूर्ण करणाऱ्या ज्योतिबा आणि सावित्रीमाईंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून, चित्रपटातील संदीप कुलकर्णी यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना दाखवण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर रिलीजनंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका नक्की कोणता अभिनेता साकारणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता आता फारकाळ न ताणता अखेर अभिनेत्याची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म’, तर जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला आहे.