‘घरकुल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ : निवारा हक्क समितीच्या मोर्चाने नगरपरिषद परीसर दणाणला

भोगवटाधारकांना मालकी हक्क द्या, घरकूल योजना राबविताना दारिद्र्यरेषेची अट रद्द करा या मागण्यांचे दिले निवेदन

टीम AM : भोगवटाधारकांना मालकी हक्क द्या, सर्व झोपडपट्टीवासीयांना घरकूल योजना राबविताना दारिद्र्यरेषेची जाचक अट रद्द करा, यासह आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनतेच्या समस्या घेऊन शुक्रवार, दिनांक 22 डिसेंबर रोजी जातीअंत संघर्ष समिती व निवारा हक्क समितीने नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबत भोगवटाधारकांना घरकूल देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्याबद्दल मोर्चेकऱ्यांकडून नगरपरिषद प्रशासनाचे अभिनंदनही करण्यात आले. तत्पूर्वी निवारा हक्क समितीच्या मोर्च्याने नगरपालिका परीसर दणाणून गेला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन नगरपालिका प्रशासनाला दिले.

सदरील मागण्यांसाठी सदर बाजार येथून फलक घेऊन, घोषणा देत निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक मार्गे नगरपालिका परीसरात धडकला. या मोर्चाचे नेतृत्व जातीअंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक व निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे यांनी केले. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक सहभागी झाले होते. ‘घरकुल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

यावेळी कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले‌. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक यांनी निवेदन स्वीकारले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदरील मागण्या करीत असताना देशाने स्वीकारलेली लोकशाही आणि मिश्र अर्थ व्यवस्थेच्या धोरणांना सत्ताधारी आणि प्रशासन हरताळ फासत आहे, संसद एकपक्षीय करण्यासाठी संसदेचे सभासद शेकडोंनी निलंबीत करण्यात येऊन नवीन तीन कायदे पास करून लोकांचा आवाज उठविणारे कार्यकर्ते व पक्ष संघटनांना कायम कारागृहात ठोसण्यासाठी प्रस्तावित तीन कायदे येत आहेत, याचा आम्ही निषेध करतो. सन 2016 पासून आम्ही निवारा प्रश्न ऐरणीवर आणला असून बेघर व झोपडपट्टीतील रहिवास या बद्दलचे विदारक चित्र प्रशासन व शासन यांच्यासमोर वेळोवेळी मांडले आहे, अद्याप नगरपरिषद अंबाजोगाईने गरीब विरोधी धोरण घेऊन घरकुलांचे प्रश्न अडगळीत टाकले, काल आपण भोगवटाधारकांना घरकूल देण्याचे लेखी आश्वासन दिले त्याबद्दल आपले अभिनंदन, त्यामुळे लवकरात लवकर भोगवटाधारक यांच्या घरांची जागा मालकी हक्कात घ्या, नसता काही दिवसांत परत आम्हाला मोठे व उग्र असे आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी, असा इशाराही जातीअंत संघर्ष समिती, बीड जिल्हा निमंत्रक तथा निवारा हक्क समिती, अंबाजोगाईचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे‌, विनोद शिंदे यांनी यावेळी निवेदनातून दिला. तसेच याप्रश्नी विद्यमान मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे हे सकारात्मक आहेत. ते हा प्रश्न सोडवतील, असा विश्वासही कॉ. पोटभरे‌ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

शासन आणि प्रशासन यांचे वेधले लक्ष

याबाबत बोलताना विनोद शिंदे म्हणाले की, आम्ही मुख्याधिकारी (न.प.अंबाजोगाई.) यांची यापूर्वीही अनेकदा भेट घेऊन, निवेदन दिले आहे. त्यांच्याशी चर्चा, विनंती करून तसेच प्रसंगी विविध माध्यमांतून आंदोलने करून याप्रश्नी शासन आणि प्रशासन यांचे लक्ष वेधले आहे. यासह इतर समस्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी जनतेच्या समस्या घेऊन आज शुक्रवार, दिनांक 22 डिसेंबर रोजी जातीअंत संघर्ष समिती व निवारा हक्क समितीच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. 

सदरील निवेदनावर भागवत जाधव, राजाराम कुसळे, अशोक सोनवणे, जयश्री घनघाव, गुलनाझ शेख, सज्जूलाला शेख, अविनाश कुराडे, शेख महेबुब, शेख युसूफ, शेख महेमुद इक्बाल, शेख साजेद, मोबीन शेख, गोरख सिंग, शेख आसेफ, अतुल पवार, प्रदीप घनघाव, प्रदीप कोरडे, कलिमा पठाण, चांदणी पौळे, मेहराज शेख मुसा, शेख रेश्मा, लक्ष्मी मंजुळे, अखिल पठाण, प्रशांत शिंदे, खादर पठाण, तायप्पा बंडगर, सरदार पठाण, बद्रुद्दीन शेख आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.