मराठा आरक्षण : ‘त्या’ नातेवाईकांनाही प्रमाणपत्र मिळावं : जरांगे पाटील 

टीम AM : मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल त्यांची या मुद्द्यावर भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली. 

मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांचा या शिष्टमंड‍ळात समावेश होता. रक्तातील सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं. मामाला किंवा मावशीला देखील प्रमाणपत्र मिळावं असं जरांगे म्हणाले. मात्र, असं करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं. संध्याकाळी उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी स्वतंत्र कायदा करावा लागेल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी पुण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हे सांगितलं.