टीम AM : औसा – नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून औसा शहराजवळ कार व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक व कारमधील 3 शिक्षक हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, खरोसा येथील मुख्याध्यापक संजय बाबूराव रणदिवे व त्यांचे सहकारी शिक्षक जयप्रकाश मोतीराम बिराजदार हे दोन व किल्लारी येथील रहिवासी तथा आनंदवाडी (ता. औसा) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महेबुब मुनवरखान पठाण हे एका खासगी कारने बोरफळ रोडने औसाकडे येत असताना नागरसोगा उड्डाण पुलाजवळ आले असता समोरुन जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला कारची जोराची धडक बसली. यात कारचालक राजेसाब बागवान (रा. किल्लारी) याच्यासह तीनही शिक्षक जागीच ठार झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरचा अर्धा भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे.
कारमधील मृतदेह काढण्यासाठी क्रेन, कटर, जेसीबीचा वापर करावा लागला. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नाने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.