टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कारला अचानक लागलेल्या आगीत चालका शेजारी बसलेल्या सीटवरच्या व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना बर्दापूर येथील पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय मार्गावर बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. सदरील कारचा मालक लातूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी एम.एच. 08 आर 7879 या क्रमांकाची कार सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लातूरकडे निघाली होती. बर्दापूर जवळ पेट्रोल पंपानजीक राष्ट्रीय महामार्गावर सदरील कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये ही कार संपूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, त्या ठिकाणी कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे आढळून आले. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट नसून अन्य महत्त्वाची माहिती बर्दापूर पोलीस घेत आहेत.