कोविड व्हेरियंट जेएन 1 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी, दक्षता बाळगणे गरजेचे 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आढावा बैठक

टीम AM : कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले. 

कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड तपासणी सुविधेसाठी ‘आरटीपीसीआर’ मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील ‘पीएसए’ ऑक्सिजन प्लॉन्ट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत. याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.