आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा : भाजप देणार स्वबळाचा नारा ? 

टीम AM : फेब्रुवारी महिन्यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभेच्या निवडणूका लागू शकतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक ट्विट केले आहे. त्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वबळाचा नारा देणार का ? असा प्रश्न या ट्विटमुळे उपस्थित होत आहे. 

राज्याचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. नागपूरमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय होऊ शकते ? यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपाने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरविण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असेही ठरविण्यात आले, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपासोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असे सांगून महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणटले आहे.