टीम AM : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंबासाखर कारखाना, वाघाळा येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी 10 फूट उंचीचे भव्य व्यासपीठ, 10 एलईडी स्क्रीन, दीड लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी 8 ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी व्यवस्था पूर्ण झाली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे – पाटील हे आपल्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. या दौ-याला 1 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील अंबासाखर कारखाना परिसरात भव्य सभा होत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाज बांधव व मराठा कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करित आहेत. परळी, अंबाजोगाई तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्यावस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत. याशिवाय जागोजागी बॅनर, दुचाकी – चार चाकी वाहनांना स्टिकर लावलेले आहेत, गावागावांत रिक्षातून सभेची माहिती देण्यात येत आहे. मराठा समाजातील तरुणांनी सोशल मीडिया सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल, असा संयोजकांचा विश्वास आहे. मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे अहवान सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेसाठी मदतीचा ओघ सुरु
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी गावागावातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी बांधवांकडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे, मदतीचा ओघ सुरूचं आहे.
मुस्लिम बांधवांचा सभेसाठी पाठींबा
संपूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पाटील यांच्या सभांचा धुमधडाका सुरूच आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या जाती – धर्माचे लोक मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत असून अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनी सभास्थळी येऊन स्वयंप्रेरणेने पाठिंबा दिला आहे
सभेसाठी आलेल्या बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्त येणाऱ्या महिला व बांधवांसाठी चहा, खिचडी व बिस्किट अशा अल्पोपहाराची तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहरासह ग्रामीण भागातील गावकऱ्यांकडून सभेच्या ठिकाणी करण्यात येत आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, तेरा पोलिस उपनिरीक्षक, एकशे दहा पोलिस अंमलदार, दहा महिला पोलिस अंमलदार, पाच ट्राफिक पोलिस कर्मचारी यासह दंगल नियंत्रक पथक व पोलिसांच्या मदतीला दोन हजार स्वयंसेवक असणार आहेत
वाहतूकीत फेरबदल
लोखंडी सावरगाव टी – पॉईंटवरून लातूरकडे जाणारी वाहने कारखाना पुलावरून जातील, पाण्याच्या टाकीच्याकडून लातूरकडे जाणारी वाहने पुलावरून लातुरकडे जातील, पाण्याच्या टाकीच्याकडून कारखाना सभेसाठी जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक सुरू राहील. लातूरकडून येणारी वाहने बर्दापूर किंवा पोखरी मार्गे अंबाजोगाई शहराकडे जातील. मुरुड रोडवरील येणारी वाहने देवळा – पाटोदा – ममदापूर – माकेगाव मार्ग – लोखंडी सावरगाव टी – पॉईंटकडे वळविण्यात आली आहेत. वाहतूक व्यवस्थेसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून फेरबदल करण्यात आला आहे.