शत्रुघ्न सिन्हांनी ‘या’ अभिनेत्रीसाठी केला होता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना फोन, नेमकं काय होतं प्रकरण ?

टीम AM : अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसलेल्या अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आताचे कलाकारच नाही तर अगदी 70 आणि 80 च्या दशकात सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेते व अभिनेत्रींना खूप संघर्ष करावा लागला होता. याच यादीत एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचाही समावेश आहे. आज 9 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

रीना रॉय यांची जोडी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजली. चित्रपटात काम करत असताना, ते एकमेकांच्या प्रेमात देखील आकंठ बुडाले होते. शत्रुघ्न आणि रीना यांनी तब्बल डझनभराहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरू होत्या. 1982 मध्ये दिग्दर्शक पहलाज रीना, शत्रुघ्न आणि संजीव कुमारसोबत ‘हथकडी’ हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटापूर्वीच शत्रुघ्न आणि रीना यांच्यातील प्रेम फुलले होते. पण, 1980 मध्ये शत्रुघ्नने पूनम सिन्हांसोबत लग्न केले. लग्नानंतरही त्यांचे रीनासोबतचे नाते 7 वर्षे टिकले होते. पण, हळूहळू रीनाला वाटू लागले की, शत्रुघ्न आपल्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला.

या दरम्यान त्यांच्या नात्याचा चित्रपटावरही परिणाम होऊ लागला. रीना यांना वाटू लागले की, शत्रुघ्न आपल्याशी लग्न करणार नाही, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास देखील नकार दिला. माझ्याशी लगेच लग्न केले नाही, तर येत्या आठ दिवसांत कुणाशी तरी लग्न करेन, अशी अट देखील त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना घातली. मात्र, शत्रुघ्न यांच्या बाजूने काहीच प्रतिक्रिया न आल्याने रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्नगाठ बांधली. या जोडीला जन्नत नावाची मुलगी देखील आहे.

रिना आणि मोहसिन यांचे नाते फार काळ टिकले नाही. मोहसिनने रीना यांना घटस्फोट देऊन घराबाहेर काढले. रीना यांना मुलीची कस्टडी मिळाली नाही. त्यांनी आपली मुलगी परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण जन्नत मोहसीनकडेच राहिली. अशा कठीण काळात शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयच्या मदतीसाठी पुढे आले होते. शत्रुघ्न सिन्हा हे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल झियाउल हक यांच्या मुलीचे मित्र होते आणि त्यामुळेच ते त्यांच्या घरी जायचे. जेव्हा त्यांना रीना यांच्या अडचणीबद्दल कळालं, तेव्हा त्यांनी ही गोष्ट झियाउल हक यांना सांगितली, तसेच रीनाला आपल्या मुलीची कस्टडी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली होती. झियाउल हक यांनी शत्रुघ्न सिन्हांची विनंती मान्य केली आणि जन्नतची कस्टडी रीना रॉय यांना दिली. त्यानंतर रीना यांनी लेकीला मुंबईत परत आणले. आता या माय – लेकी मुंबईमध्ये अभिनय शिकवतात.