धर्मेंद्र यांच्या एका फोन कॉलमुळे मोडलं होतं हेमा मालिनी यांचं ठरलेलं लग्न ! वाचा घडलेला किस्सा.. 

टीम AM : बॉलिवूडचे ‘ही मॅन’ अशी ओळख असलेले अभिनेता म्हणजे धर्मेंद्र आज 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शानदार अभिनय आणि आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जाणारे धर्मेंद्र एकेकाळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले होते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. त्यावेळी ‘ड्रीम गर्ल’ वर अनेक अभिनेते फिदा होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक होते. एक वेळ अशी होती की हेमा मालिनी अभिनेता जितेंद्र यांच्याशी लग्न करणार होत्या. पण त्याच वेळी धर्मेंद्र यांच्या एका फोन कॉलनं असं काही केलं की हेमा – जितेंद्र कायमचेच वेगळे झाले.

1974 चा तो काळ जेव्हा एक नाही तर तीन – तीन मोठे स्टार हेमा यांच्याशी लग्न करायला तयार होते. संजीव कुमार, जितेंद्र आणि धर्मेंद्र या तिघांनाही हेमा आवडत होत्या. संजीव कुमार यांनी तर आपल्या आई – वडीलांना हेमा यांच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवलं होतं. मात्र, यावेळी हेमा यांच्या आईनं तिचं वय लग्नासाठी कमी असल्याचं सांगत हा प्रस्ताव नाकारला. यानंतर धर्मेंद्र हेमा यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी हेमा यांच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा देऊन टाकली.

ज्यावेळी जितेंद्र यांनी हेमा मालिनी यांना लग्नाची मागणी घातली, त्यावेळी हेमा आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात बराच तणाव निर्माण झाला होता. कारण धर्मेंद्र यांचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याशी लग्नानंतर त्यांच्या नात्याचं काय होईल याची हेमा यांना चिंता होती. तर दुसरीकडे धर्मेंद्र यांना सुद्धा त्यांची पहिली पत्नी आणि मुलांबाबत काय निर्णय घेता येत नव्हता.

जितेंद्र सिंखगल होते. त्यामुळे त्यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारणं हेमा यांच्यासाठी खूपच कठिण झालं होतं. जितेंद्र त्यांच्या आई – वडीलांना घेऊन हेमा यांच्या घरी गेले. दोघांचे पालक एकमेकांशी बोलत असतानाच हेमा यांना धर्मेंद्रचा फोन आला. त्यांनी रागातच हा निर्णय घेण्याआधी एकदा मला भेट असं सांगितलं. त्या फोननंतर हेमा फारच बेचैन झाल्या. काय निर्णय घ्यावा हे त्यांना ठरवता येईना. त्यांची ही अवस्था पाहिल्यावर जितेंद्र यांना वाटलं की हेमा यांनी जर आपला निर्णय बदलला तर.. त्यामुळे त्यांनी तिरुपती मंदिरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेमा याबद्दल विचार करतच होत्या इतक्यात पुन्हा एकदा फोन वाजला. पण यावेळी तो फोन जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा यांचा होता. शोभा यांनी जितेंद्र यांना प्रेमाची शपथ देत या लग्नाचा निर्णय घेण्याआधी विचार करण्याचा सल्ला दिला. हेमा यांच्या घरी सतत एकदा धर्मेंद्र तर एकदा शोभा यांचा फोन येत राहिला. असंही म्हटलं जातं की, धर्मेंद्र लगेचच फ्लाइटनं चेन्नईला हेमा यांच्या घरी जाऊन पोहोचले होते. त्यामुळे हेमा यांच्याशी लग्न करण्याचं जितेंद्र यांचं स्वप्न शेवटी अपुरंच राहिलं. त्यानंतर 1976 मध्ये त्यांनी गर्लफ्रेंड शोभाशी लग्न केलं आणि त्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांनीही लग्न केलं.