गायक उदित नारायण यांना ‘या’ संगीतकारामुळे मिळाली बॉलिवूडमध्ये ‘एण्ट्री’ : जाणून घ्या काही खास गोष्टी….

टीम AM: ‘रोमँटिक गाण्यांचे बादशाह’ अशी प्रसिद्धी मिळवणारे बॉलिवूडचे लोकप्रिय गायक म्हणजे उदित नारायण. त्यांनी 90 च्या दशकात गायलेल्या गाण्यांना चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. त्यांच्या गाण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली होती. पण इथपर्यंतचा उदित यांचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला नेपाळी रेडिओमध्ये काम केले होते. आज उदित नारायण यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी….

आपल्या सुमधुर आवाजाने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदित नारायण यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. 1 डिसेंबर 1955 रोजी उदित नारायण यांचा जन्म झाला. उदित नारायण यांचा जन्म बिहारमधील सुपौल येथे झाला. त्यांची आई भारतीय होती. तर, वडील नेपाळमधून होते. उदित नारायण यांनी आपल्या करिअरची सुरुवात देखील नेपाळी रेडिओमधून केली होती.

उदित नारायण यांनी 1970 मध्ये नेपाळी रेडिओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते या रेडिओसाठी मैथिली भाषेतून गाणी गात होते. याच स्ट्रगलच्या काळात त्यांची भेट गीतकार अंजान यांच्याशी झाली. अंजान यांनी उदित नारायण यांची भेट संगीतकार चित्रगुप्त यांच्याशी करून दिली आणि उदित यांची भोजपुरी इंडस्ट्रीत एन्ट्री झाली. याच दरम्यान उदित यांना त्यांचे पहिले बॉलिवूड गाणे देखील मिळाले.

संगीतकार चित्रगुप्त यांची मुले त्यावेळी बॉलिवूड चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळत होते. त्यांना उदित नारायण यांचा आवाज आवडला आणि त्यांनी आपल्या चित्रपटासाठी त्यांची निवड केली. अशाप्रकारे उदित नारायण यांना ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील ‘पाप कहते हैं’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली. उदित नारायण यांनी गायलेले हे गाणं सुपरहिट झाले. या गाण्यासाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता.

उदित नारायण यांनी केवळ हिंदीच नाही तर, तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम या भाषेतही गाणी गायली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘लगान’, स्वदेश’, ‘हम दिल दे चुंके सनम’ अशा अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. सुमधुर गाण्यांसाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 2016 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवण्यात आले होते.