टीम AM : पिक विमा, दुष्काळी अनुदान, कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी शेतकरी बांधवांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करित या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
◾सन 2022 – 23 चा अग्रीम पीकविमा देण्यात यावा. अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाला वेगळा न्याय का ? 13,500 रुपये प्रमाणे हेक्टरी 25 टक्के प्रमाणे अग्रीम द्यावा व पुढील पीक कापणीनंतर जो निकष बसेल त्याप्रमाणे विमा मिळावा.
◾खरीप हंगामातील बहुभूधारक शेतकर्यांचा तपासणी अहवाल, व्हेरीफिकेशनसाठी प्रलंबीत ठेवलेली पीकविमा रक्कम तात्काळ देण्यात यावी, अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शेतकर्यांची पीक कर्ज माफी करावी.
◾पीक विमा रकमेतून पीक कर्ज वसुली करु नये, सन 2022 व 2023 चे दुष्काळी चालू वर्षाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, सन 2019 – 20, 2020 – 21, 2021- 22 मधील अतिवृष्टी व नापीकीमुळे मंजूर झालेले अनुदान तात्काळ वाटप करावे, नियमित पीक कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना शासनाने मंजूर केलेले प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वाटप करावे. या सर्व मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.