महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाची शक्यता : ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

टीम AM : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही पहाटेपासूनच राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि गारपिटीचा शक्यता आहे. यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज ‘यलो अलर्ट’ दिला आहे.