‘टाइमपास’ चित्रपटाने मिळाली दगडूच्या करिअरला दिशा : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला दिली नात्याची कबुली

टीम AM : प्रथमेश परब या अभिनेत्याने मराठी मनोरंजन विश्वासोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याचा ‘टाइमपास’ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात दगडू आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. टाइमपास नंतर ‘टाइमपास 2’ आणि ‘टाइमपास 3’ असे त्याचे पुढचे भागही प्रदर्शित झाले. 

‘टाइमपास’ चित्रपटाने प्रथमेश परबच्या करिअरला वेगळी दिशा दिली. दगडू फेम प्रथमेश परबचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची खऱ्या आयुष्यातली प्राजू अर्थात गर्लफ्रेंड कोण आहे ते आपण जाणून घेऊयात.

‘व्हॅलेंटाईन डे’ ला नात्याची कबूली

प्रथमेश जिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे तिचे नाव आहे क्षितिजा घोसाळकर. प्रथमेश आणि क्षितिजा गेल्या 2 – 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी मकर संक्रांतीला आणि दिवाळीला एकत्र फोटोशूटही केले होते. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. यावर्षीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रथमेशने आपल्या नात्याची कबुली दिली. प्रथमेशच्या सगळ्या चित्रपटांच्या प्रीमियरला क्षितिजा आवर्जून हजेरी लावत असते. प्रथमेशच्या सोशल मीडियावरच्या प्रत्येक पोस्टवर ती कमेंट करत असते. क्षितिजाने एक व्हिडिओ शेअर करत त्या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली ते सांगितले होते.

क्षितिजा घोसाळकर कोण ?

क्षितिजा घोसाळकर ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि मॉडेल आहे. ती एक एनजीओसुद्धा चालवते. तसेच ती एक लेखिका आहे. unspoken_hashtag या पेजवर क्षितिजाने आपले लिखाण शेअर केले आहे.

मराठी, हिंदी सिनेमातही प्रथमेशचे काम

प्रथमेशचा ‘सिंगल’ हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता. या सिनेमात त्याने अभिनय बेर्डे आणि प्राजक्ता गायकवाडसोबत काम केले होते. प्रथमेशने ‘दृश्यम’ या अजय देवगणच्या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते, तर 2013 साली आलेला ‘बालक पालक’ हा त्याचा पहिला मराठी सिनेमा होता. ‘टाइमपास’ मध्ये पहिल्यांदा त्याला मुख्य पात्राची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या हिंदी वेबसीरीजमध्येही त्याने काम केले आहे. आगामी काळात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहावे लागेल.