राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : ‘या’ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

टीम AM : राज्यात पुढील 24 तासांसाठी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून, याच धर्तीवर ‘यलो अलर्ट’ ही देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वीजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 

सध्याच्या घडीला अरबी समुद्राच्या नैऋत्येपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळं अवकाळी इतक्यात पाठ सोडणार नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

राज्यात सध्या मान्सूननं माघार घेतली असली तरीही अवकाळीनं थैमान घालणं सुरु ठेवलं आहे. ज्यामुळं जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पावसाच्या या स्थितीमुळं राज्यातील तापमानामध्येसुद्धा चढ – उतार पाहायला मिळणार आहेत.