टीम AM : अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द टांगेवाला’ या चित्रपटातून नावारुपास आलेले मोहम्मद अजीज हे बॉलिवूडमधील एक नामांकित गायक म्हणून ओळखले जातात. जवळपास तीन दशकं त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अजीज यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक काळ असाही होता जेव्हा ते मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर झोपून रात्र घालवत होते.
अजीज यांचा जन्म 2 जुलै 1954 साली कोलकातामधील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचं पुर्ण नाव सईद मोहम्मद अजीज असं होतं. ते मोहम्मद रफी यांचे प्रचंड मोठे फॅन होते. परंतु घरात गाणी ऐकण्याची सोय नव्हती. दोन किलोमीटर अंतरावर त्यांचे एक नातेवाईक राहायचे. त्यांच्याकडे जुना रेडियो होता. त्यावर गाणी ऐकता यावी यासाठी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या घरी जायचे. रेडियोवरील गाणी त्या गायकांच्याच शैलीत गाण्याचा प्रयत्न करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. दरम्यान मंदिरात होणारी किर्तनं, सार्वजनिक कार्यक्रम यांमध्ये देखील ते मोठ्या उत्साहाने गाणी गात.
पुढे शिक्षण पुर्ण झाल्यावर बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ते मुंबईत आले. इथे आल्यावर त्यांनी अनेक संगीतकार आणि दिग्दर्शकांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या. अनेकांना ऑडिशन्स वगैरे दिली. याच दरम्यान मुंबईतील एका रेस्तरॉमध्ये त्यांना नोकरी मिळाली. यामध्ये सुरुवातीला ते वेटरचं काम करायचे. परंतु त्यांना गाणं गाता येतं हे कळल्यावर मॅनेजरनं त्यांना ग्राहकांचं मनोरंजन करण्यासाठी गाणी गाण्याचं काम दिलं. या रेस्तरॉमध्ये अनेक नामांकित कलाकार देखील यायचे.
1984 साली जयंत देसाई यांची त्यांच्यावर नजर गेली. त्यांच्या गाण्याची शैली त्यांना आवडली. त्यामुळं ‘अंबर’ या चित्रपटाची ऑफर त्यांना मिळाली. अर्थात अजीज यांनी देखील ती ऑफर स्विकारली. अन् पुढे त्या चित्रपटानंतर त्यांचं बॉलिवूड करिअर सुरु झालं. आपल्या या प्रवासात त्यांनी प्रचंड संघर्ष केला. वेळप्रसंगी फुटपाथ आणि रेल्वेस्टेशनवर देखील ते झोपले. पण प्रयत्न सुरुच ठेवले. परिणामी आज ते बॉलिवूडमधील एक यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. मोहम्मद अजीज यांचे निधन 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाले. त्यांना विनम्र अभिवादन.