नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम AM : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं आश्वासन दिलं.