टीम AM : लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘झिम्मा’ प्रचंड गाजला होता. आता त्याच उत्साहात, त्याच टीमचा ‘झिम्मा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात स्त्रियांचं भावविश्व् उलगडलं आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर ‘झिम्मा 2’ कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे. चित्रपटातील कलाकारांनी देखील हाऊसफुल बोर्डसोबतचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आता या चित्रपटाची पहिल्या 2 दिवसांची कमाईदेखील समोर आली आहे.
‘झिम्मा 2’ मध्ये निर्मिती सावंत, क्षिती जोग, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, सुहास जोशी यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला आहे.
‘सॅकनिल्क’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1 कोटी 20 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या दुप्पट कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 2 कोटी 25 लाखांची कमाई केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने 3 कोटी 45 लाखांचा टप्पा गाठला आहे.
प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला असला तरी पुढे हा चित्रपट आणखी किती मजल मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट ‘झिम्मा’ चा रेकॉर्ड तोडणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.