अंबाजोगाईत अभियंत्याला मारहाण : रस्त्याचे काम पाडले बंद, गुन्हा दाखल

टीम AM : अंबाजोगाई शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम बंद पाडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारी घडली आहे. सदरील घटना शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग ते दवाखाना रोड दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावर घडली आहे. दरम्यान, अभियंत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद भगवानराव शेळके असे त्या मारहाण झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. 

अंबाजोगाई शहरात सध्या दलित वस्ती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग ते ‘स्वाराती’ रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु आहे. रविवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके हे विनोद गुरव, पवन वरपे, रोहित जवाडे व समाधान भोसेकर यांच्यासह सदरील रस्त्याच्या कामावर कामकाज करीत होते. यावेळी नदीम काझी (रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई) याने दुपारी एक वाजल्यापासून जवळपास दोन तास काम बंद पाडले. या दरम्यान त्याने शेळके यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच मशीनवरही दगडफेक केली.

हा सर्व घटनाक्रम मोबाईलच्या व्हिडीओ फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला असून ती रेकॉर्डिंग पोलिसांकडे देत तक्रार नोंदवली आहे. सदर तक्रारीवरून नदीम काझी याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय मेंढके करित आहेत.