टीम AM : आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’ तील ‘चंद्रा’ हे गाणे… अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले. आज अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकर हिचा वाढदिवस आहे. 23 नोव्हेंबर 1984 रोजी जन्मलेली अमृता खानविलकर यंदा तिचा 39 वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…
अमृताने ‘गोलमाल’ या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर अमृताने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘साडे माडे तीन’, ‘नटरंग’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सतरंगी’, ‘बाजी’, ‘शाळा’, ‘चोरीचा मामला’, ‘चंद्रमुखी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अमृताने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. केवळ मराठीच नव्हे तर, ‘फुंक’, ‘फुंक 2’, ‘मलंग’, ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली.
‘बोम्मई’ नावाच्या एका तमिळ चित्रपटातदेखील अमृताने काम केले आहे. या सोबतच ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी सीझन 10’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ सारख्या रियॅलिटी शोमधून देखील ती चमकली.
लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या अमृताने निर्मात्याशी लग्न केले आहे. मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय असणाऱ्या अमृता खानविलकरने अभिनेता हिमांशू मल्होत्रा याच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमाच्या सेटवर हिमांशू आणि अमृताची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. आज अमृता आणि हिमांशू लोकप्रिय कपल आहेत. अनेकांपुढे त्यांचा आदर्श ठेवला जातो.