पद्मश्री डॉ.गणेश देवी, प्रेमानंद गज्वी, संजय आवटे, योगेश खंदारे, डॉ.बी.व्ही आसेकर यांच्या उपस्थितीत व देवकी पंडित, भाविक राठोड व धनश्री देशपांडे यांच्या स्वरांनी मैफल रंगणार
अंबाजोगाई : अंबाजोगाईत गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३५ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर सोमवार, मंगळवार व बुधवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३५ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, चित्रकला स्पर्धा, उर्दू व हिंदी गझल गायन, शेतकरी परिषद, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ, शास्त्रीय गायन व अंबाजोगाईच्या हौशी छायाचित्रकारांचे पक्षी, पर्यावरण, निसर्ग व प्राण्याच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे यावर्षी आकर्षण असणार आहे.
उद्घाटन व कवी संमेलन
सोमवार, दि.२५ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वा. या समारोहाचे उद्घाटन सुप्रसिध्द लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक भाषा अभ्यासक व भाषा तज्ञ पद्मश्री डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तथा दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक संजय आवटे हे उपस्थित राहणार आहेत. रात्रौ ७.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी नांदेड येथील मराठी विभाग प्रमुख तथा सुप्रसिध्द कवी केशव सखाराम देशमुख हे राहणार असून सूत्रसंचालन अकोला येथील सुप्रसिध्द कवी अॅड.अनंत खेळकर करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री नितीन देशमुख – अमरावती, रमजान मुल्ला – पलुस, ज्योत्सना राजपुत – पनवेल, बंडू सुमन अंधेरे – रायगड, भाग्यश्री केसकर – उस्मानाबाद, प्रकाश केंदळे – नाशिक व सदाशिव सुर्यवंशी – धुळे यांचा सहभाग असणार आहे.
चित्रकला व बालआनंद मेळावा
मंगळवार, दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८.०० वा. शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध विद्यालयातील हजारो विद्यार्थी यात सहभागी होतील. स्पर्धेचा निकाल सकाळी १०.०० वा.घोषित केला जाईल व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच बाल आनंद मेळावाही आयोजित केला असून त्यात शालेय चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण केले जाईल. या बाल आनंद मेळाव्यात बाल साहित्यिक व कवी शिवाजी आंबुलगेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण पुर्णा येथील दोन्ही हात पुर्ण नसलेला अपंग युथ आयकॉन चित्रकार तथा युवा व्याख्याता योगेश खंदारे हा असणार आहे. तो पायाने चित्र काढणार असुन बाल आनंद मेळाव्यात मुलांना आपले अनुभव सांगणार आहे.
‘ख्वाब के गाँव में’हिंदी व उर्दू गझल गायन कार्यक्रम
रात्रौ ७.३० वा. सुप्रसिद्ध गझल गायक भावीक राठोड व धनश्री देशपांडे यांचा‘ख्वाब के गाँव में’हा हिंदी व उर्दू प्रचलित गझल गायनाचा बहारदार कार्यक्रमाची संगीतमय मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात हिंदी, उर्दू भाषेतील सुप्रसिध्द गझलकारांच्या गझल रचनांचे सादरीकरण होणार आहे. यात त्यांना रामेश्वर काळे – सिंथेसायझर, तबला – डॉ.देवेंद्र यादव, संवादिनी – प्रविण काळे, बासरी – रोहित बनकर, गिटार-मिलींद शेवरे, रिदम – प्रशांत ठाकरे हे साथसंगत करणार आहेत. तर चंद्रपुरचे खास निवेदक नासीर खान या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
शेतकरी परिषद
बुधवार, दि.२७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वा.शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून तत्पुर्वी पीकस्पर्धा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर शेतकर्यांना मार्गदर्शनपर भाषणे होतील. त्यात डॉ.भगवान आसेकर – विभाग प्रमुख, कृषि विद्यावेत्ता, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी हे ‘बदलत्या हवामानारुप कोरडवाहु शेती’तर डॉ.अरुण गुट्टे, विस्तार कृषि विद्यावेत्ता, विभागीय कृषि विस्तार केंद्र, अंबाजोगाई हे ‘हवामान बदलानुसार रब्बी हंमाचे व्यवस्थापन’या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी यावर्षीचे यशवंतराव चव्हाण स्मृती कृषि पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी व शेती उद्योजक (दुध प्रकल्प) रामेश्वर मांडगे – बेलवाडी, जि. हिंगोली हे असणार आहेत.
समारोप समारंभ व यशवंतराव चव्हाण स्मृती सन्मान
याच दिवशी सायं. ५.०० वा. समारोप समारंभ होत असून मुंबई येथील सुप्रसिध्द कवि, साहित्यिक, नाटककार तथा नागपूर येथे पार पडलेल्या ९९ व्या अ.भा.मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात बेलवाडी, ता.जि.हिंगोली येथील कृषि उद्योजक (दुध प्रकल्पह) रामेश्वर मांडगे यांना कृषि, देगलुरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबु बिरादार यांना साहित्य, अंबाजोगाईचे पखवाज वादक पं.उध्दव बापु आपेगावकर यांना संगीत, तर महाराष्ट्रात सकाळ समुहाच्या यीन प्रकल्पांतर्गत युवकांचे संघटन करणारे लेखक तथा पत्रकार संदीप काळे, नांदेड यांना युवागौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
शास्त्रीय संगीतसभा
रात्रौ ठिक ८.०० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत मुंबई येथील सुप्रसिध्द शास्त्रीय संगीत गायीका देवकी पंडीत यांचे गायन सादर होणार असून त्यानंतर त्या नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत, गझल सादर करतील. साथसंगतीत त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी – पुणे व संवादिनीवर अभिषेक शिनकर – पुणे हे साथ करणार आहेत. देवकी पंडित गायनाला येत असल्याने संगीत क्षेत्रातील रसिकांचे खास अकर्षण असेल.
यावर्षी हा समारोह महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार असून यात चित्रकला प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अंबाजोगाई येथील हौशी छायाचित्रकारांचा समुह‘टीम भोवताल’यांच्या सदस्यांचे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहुन सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन दगडू लोमटे, भगवानरावजी शिंदे बप्पा, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.सुधीर वैद्य, सतिश लोमटे, प्रा. भगवान शिंदे, माजेद सिद्दीकी, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा.सागर मुंडे यांनी व इतर पदाधिकारी व राजपाल लोमटे यांनी केले आहे.