राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम

स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, फळ वाटप, रक्तदान शिबीर, गरजूंना बस सवलत कार्ड व ब्लँकेट वाटप, मोफत नेत्ररोग निदान व मोतीबिंदू निदान शिबिर

अंबाजोगाई : बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, फळ वाटप, रक्तदान शिबीर, गरजुंना बस सवलत कार्ड, गरजुंना थंडी पासून बचाव करणाऱ्या ब्लँकेट, स्वाराती रूग्णालयास नेब्युलायझर मशिन, बी.पी.चेक मशिन वाटप करण्यात आले. मोफत नेत्ररोग निदान व मोतीबिंदू निदान शिबिर, योगेश्‍वरी मंदिरात महाआरती, संघर्षभूमी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करणे तसेच चनई येथील हजरत ख्वाजा मसुद किरमाणी दर्गाह येथे चादर चढवणे आदी उपक्रम आयोजित करण्यात आले.

बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मित्र मंडळाच्या वतीने विधायक व सामाजिक असे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही मित्रमंडळाच्या वतीने अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 19 नोव्हेंबर हा राजकिशोर मोदी यांचा वाढदिवस आहे. या दिवशी राजकिशोर मोदी यांना निरोगी दिर्घायुष्य लाभावे याकरिता मंगळवारी सकाळी 6 वा अंबाजोगाई बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता श्री योगेश्‍वरी देवी मंदिरात महाआरती करण्यात आली. सकाळी 10 वाजता चनई येथील सर्वधर्मियांचे आदरस्थान असणाऱ्या हजरत ख्वाजा मसुद किरमाणी दर्गाह येथे चादर चढविण्यात आले. त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता संघर्षभूमी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच 10.30 वाजता स्वाराती रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करून व अवयवदान फॉर्म भरून घेतले. या सोबतच सकाळी 11 वाजता फिजिओथेरेपी शिबीराचेही आयोजित करण्यात आले होते. तर 11.30 वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महिला, युवक यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्षा रचनाताई सुरेश मोदी यांनी केले. रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी स्वाराती रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागाने सहकार्य केले.

स्वाराती रूग्णालयास अधिक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. सिद्धेश्‍वर बिराजदार, डॉ. सचिन गालफाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मित्र मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते रूग्णालयास सात नेब्युलायझर मशिन व दहा बीपी चेक मशिन, पाच वजन मोजणी मशीन, एक सक्शेशन मशीन, एक इसीजी मशीन भेट म्हणुन देण्यात आले. वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोदी मित्र मंडळाच्या बहुसंख्य कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन पुढाकार घेतला.