ग्रामीण महिलांच्या ‘पंचगव्य’ दिव्यांनी दिले कष्टाचे मोल

1500 दिव्यांचे उत्पादन, महिलांचा उपक्रम

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथील महिलांनी बनविलेल्या ‘पंचगव्य’ दिव्यांनी या दिवाळीत चांगलीच मागणी मिळवली. उमेद अंतर्गत गटप्रेरीका महिलांनी 1500 दिव्यांचे उत्पादन करून विक्री केली.

गाईच्या शेणापासून बनवलेल्या या दिव्यांमध्ये कापूराचा वापर केल्याने त्याचा धूप उदबत्तीसारखा सुगंधही दरवळत राहतो. या दिव्यांसाठी गोशाळेतील गाईचे शेण मोफत मिळाल्याने दिव्यांचा खर्च काही प्रमाणात वाचला. मात्र इतर वस्तूसाठी खर्च करावा लागतो. 

असे बनवले पंचगव्य दिवे 

गोशाळेतील गाईचे शेण आणून ते चांगले एकत्र करून घेतले. त्यात इतर साहित्य मिसळून घेतले. यासाठी लागलेले साहित्य गाईचे शेण, गोमूत्र, नागरमोथा, गुगळ, उद, जटामासी, राळ, गेरु, कपूर कचरी, काव हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर दिव्यांसाठी लगदा तयार झाला. तो दिव्यांच्या साचात भरून हे ‘पंचगव्य’ दिवे तयार झाले. ही पणती लाऊन त्यातील तेल संपले तरी तो धुप सारखा जळत राहतो. सुगंधही दरवळत राहतो. 

या जळणाऱ्या दिव्यांबरोबरच न जळणारे दिवेही या महिलांनी बनवले आहेत. यासाठी देशी गाईचे शेण, गोमूत्र, काव,धुप, मंजन, गोबर गोपमाळ असे साहित्य वापरून हे दिव बनवले जातात. मात्र हा दिवा त्यातील तेल संपल्यानंतर जळत नाही. 

श्रीपतराववाडी (ता. अंबाजोगाई) उमेदच्या प्रेरीका राजश्री बालासाहेब तारळकर यांनी कृषी विज्ञान केंद्रात याचे प्रशिक्षण घेऊन हा ‘पंचगव्य’ दिव्यांचा उपक्रम राबविला. यासाठी त्यांना माऊली जाधव यांनी साहित्य उपलब्ध करून दिले. आशादत्त गोशाळेचे संचालक उमेश पोखरकर यांनी गाईचे शेण मोफत उपलब्ध करून दिले. हे दिवे बनवण्यासाठी वरपगाव येथील स्वाती चंद्रकांत टेमकर, स्वाती राम वीर, प्रगती श्याम राऊत यांनी त्यांना सहकार्य केले. राजश्री तारळकर यांनी यापुर्वी सकाळच्या तनिष्का गटास पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आहे.

अशी केली विक्री

दिवाळीपूर्वी त्यांनी यंदा एक प्रयोग म्हणून 1500 पंचगव्य दिव्यांचे चार महिलांनी उत्पादन केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांचे 1500 दिवे  विकले गेले. आणखी 1200 दिवे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते त्यांनी अंबाजोगाईच्या पंचायत समिती परिसरात स्टाॅलवर ठेवले आहेत. हे दिवे बनविण्यासाठी त्यांना 7000 हजार रुपये खर्च झाला. तर त्यापासून 15000 रुपयाचे उत्पन्न झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने आरोग्यदायी असलेल्या या दिव्यांना चांगला प्रतिसाद आहे. यापुढे या उपक्रमाला उद्योगाचे स्वरूप देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस राजश्री तारळकर यांनी व्यक्त केला.