टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री नीलम आज तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1986 मध्ये आलेला ‘इल्जाम’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदाची जोडी अभिनेत्री नीलमसोबत दिसली होती. दोघांची जोडी सुपरहिट ठरली आणि त्यांनी एकुण 14 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या दोघांनी मिळून ‘घराना’, ‘खुदगर्ज’, ‘सिंदूर’, ‘हत्या’, ‘लव 86’, ‘दो कैदी’, ‘इल्जाम’, ‘फर्ज की जंग’, ‘बिल्लू बादशाह’, ‘ताकतवर’, ‘घर में राम गली में श्याम’, ‘दोस्त गरीबों का’ असे अनेक चित्रपट केले.
नीलमच्या प्रेमात पडला होता गोविंदा
80 आणि 90 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री नीलम आणि गोविंदाचे अफेअर बरेच गाजले होते. पडद्यावर गोविंदा आणि नीलमची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’ च्या सेटवर गोविंदा व नीलम यांची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि याचदरम्यान नीलम व गोविंदा एकमेकांच्या जवळ आलेत.
गोविंदा नीलमवर इतके प्रेम करायचा की, तिला कुण्या दुस-या हिरोसोबतही पाहू शकत नव्हता. तिच्यासोबत लग्न करण्याची गोविंदाची इच्छा होती. पण गोविंदाच्या आईला हे नाते मान्य नव्हते. तिने गोविंदासाठी दिग्दर्शक अनिल सिंहची मेहुणी सुनीता (गोविंदाची पत्नी) हिला पसंत केले होते. आईच्या इच्छेखातर अखेर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले.
एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले होते की, तो नीलमवर प्रेम करायचा आणि सुनीताशी फ्लर्ट. लग्नानंतरही गोविंदा नीलमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याने नीलमपासून हे लग्न लपवून ठेवले होते. पण एकदिवस नीलमला कळले आणि तिने गोविंदासोबतचे सगळे नातेसंबंध संपवून टाकले.
दुसरीकडे, गोविंदाच्या लग्नाच्या काही वर्षांनी नीलमने बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केले पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नीलमने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत दुसरे लग्न केले. दोघांनीही एक मुलगी दत्तक घेतली आहे. नीलमने 2001 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केला होता. पण, 2020 मध्ये तिने नेटफ्लिक्सच्या रिॲलिटीवर आधारित सीरिज ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ द्वारे पुनरागमन केले होते.
पहिल्याच भेटीत नीलम कोठारीच्या प्रेमात पडला होता समीर
समीरने 24 जानेवारी 2011 रोजी बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीसोबत लग्न केले. नीलम आणि समीर यांची पहिली भेट एकता कपूरच्या प्लेदरम्यान झाली होती. नीलम आणि एकता या चांगल्या मैत्रिणी आहेत. नाटक संपल्यावर नीलमने समीरचे कौतुक केले पण स्वभावाने लाजाळू असलेला समीर तिला उत्तर न देता निघून गेला. समीरला एका नजरेत नीलम आवडली होती. एका वर्षानंतर समीरला तुषार कपूरच्या पार्टीत पुन्हा नीलमला भेटण्याची संधी मिळाली. इकडे समीर नीलमशी फक्त 15 सेकंद बोलला आणि तो तिला कॉल करेल असे म्हणाला. पण समीरकडे ना तिचा नंबर होता ना तिच्याशी बोलण्याची हिंमत.
मित्राकडून नीलमचा नंबर मागितला
मित्रांनी बरेच समजावल्यानंतर समीरने नीलमशी बोलायचे ठरवले आणि मित्राकडून तिचा नंबर घेतला. पण दुर्दैवाने नीलमने त्याचा फोन उचलला नाही. त्यामुळे नीलम गर्विष्ठ आहे असे समीरला वाटले होते. समीरने तिला मेसेज करुन पुन्हा फोन कॉल केला तर चालेल का? असे विचारले होते. त्यानंतर नीलमने त्याला फोन केला आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.
एकमेकांना ओळखल्यानंतर दोघेही रिलेशनशिप मध्ये आले. लग्नाआधी किमान 10 वेळा त्यांचे एकमेकांशी ब्रेकअप झाले होते, परंतु प्रत्येक वेळी दोघेही एकमेकांना समजूतदारपणे माफ करायचे आणि गैरसमज दूर करायचे. दोघेही आज सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.