मुलीमुळे खूप खचल्या होत्या माला सिन्हा.. म्हणूनच घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम AM : 60 आणि 70 च्या दशकातील बॉलीवूडच्या हिट अभिनेत्रींची नाव घेतली तर त्यात माला सिन्हा यांचे नाव नक्कीच सामिल होते. माला सिन्हा यांचा आज वाढदिवस आहे. माला सिन्हा म्हणजे एक अशा अभिनेत्री ज्यांची जोडी मोठ्या पडद्यावर त्या काळातील प्रत्येक सुपरस्टार सोबत उठून दिसली अन् जोरदार गाजली. लोकांनी माला सिन्हा यांना अभिनेत्री म्हणून खूप पसंत केलं. पण एक वेळ अशी आली की माला सिन्हा यांनी हिंदी सिनेमां सोबतचं आपलं नातं तोडलं ते कायमचं आणि अचानक त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या. आणि असं त्यांनी आपली मुलगी प्रतिभा सिन्हा हिच्यासाठी केलं असं बोललं जातं. अखेर काय आहे या गोष्टीमधलं सत्य..चला जाणून घेऊया.

माला सिन्हा यांच्या मुलीचं नाव प्रतिभा सिन्हा.. जिनं आपल्या आईप्रमाणेच बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहिलं. तिच्यामध्ये तेवढी पात्रता देखील होती. प्रतिभा सुंदर होतीच, त्यासोबतच आईकडून तिला अभिनयाचा वारसा देखील मिळाला होता. ‘राजा हिंदुस्थानी’ मधील हिट गाणं ‘परदेसी – परदेसी जाना नही..’ मध्ये प्रतिभा दिसली होती आणि त्या गाण्यानं तिला फेम मिळवून दिलं होतं. पण त्यानंतर अनेक सिनेमात दिसूनही प्रतिभाचं करिअर काही खास घडलं नाही. कितीतरी फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर प्रतिभानं शेवटी फिल्म इंडस्ट्रीपासनं दूर जाण्याचं ठरवलं.

रिपोर्ट्सनुसार समजतंय की, मुलीच्या फ्लॉप करिअरला पाहून माला सिन्हा देखील अस्वस्थ होत्या…त्या आतून तुटल्या होत्या आणि या कारणानं त्यांनी आपलं दुसरं कुटुंब असणाऱ्या बॉलीवूडपासनं दूर राहणं पसंत केलं. आजही त्या कोणत्याच इव्हेंटला दिसत नाहीत. फिल्मी लाइमलाइटपासून त्या स्वतःला दूर ठेवत आहेत.