उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ‘ॲक्शन’ मोडवर : 14 ट्रॅव्हल्सवर कारवाई, 4 लाख 89 हजारांचा दंड 

टीम AM : दिवाळी सणानिमित्त जादा भाडे वाढ  करुन प्रवाशांची लुट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर केज येथे शुक्रवारी (दि.10) सायंकाळी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी चौदा ट्रॅव्हल्सवर 4 लाख 89 हजार रुपये दंड लावण्यात आला.

दिवाळीच्या निमित्त प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणाहून प्रवासी मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे ये – जा करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी मोठ्या प्रमाणात भाडे वाढ केली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई  करणे सुरू केले आहे. गुरुवारी लोखंडी सावरगाव येथे कारवाई केल्यांनतर शुक्रवारी सायंकाळी केज येथे कार्यालयाचे वाहन निरीक्षक शेखर आचार्य यांनी थांबून पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणाहून येणाऱ्या सर्व खाजगी गाड्यांची तपासणी केली. यावेळी विविध ठिकाणाहून येणाऱ्या 14 ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यावेळी त्यांना ट्रॅव्हल्सची पासिंग नसणे, वाहनकर नसणे, ज्यादा भाडे आकारणे असे प्रकार दिसून आले. यामुळे या 14 वाहनांवर 4 लाख 89 हजार रुपये एवढी दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून नगदी 1 लाख 57 हजार 100 रुपये वसूल करण्यात आले. तर उर्वरित 3 लाख 31 हजार 900 रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहेत.  

खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार भाडे आकारावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक शेखर आचार्य यांनी दिला आहे.