संगणक परिचालकांकडून आमरण उपोषणाचा इशारा
टीम AM : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संगणक परिचालकांचे मानधन गेल्या नऊ महिन्यांपासून रखडले असल्याने संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड जिल्हा परिषदेत 03 तर प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीत 01 असे एकूण 14 संगणक परिचालक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर लेख्यांची माहिती संगणकीकृत करून केंद्र शासनाच्या अज्ञावलीमध्ये माहिती भरणे तसेच केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालय आणि राज्य शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या विविध अज्ञावलींमध्ये माहिती भरणे इत्यादी महत्वपूर्ण कामे या संगणक परिचालकांकडून केली जातात. परंतू, गेल्या नऊ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दिवाळी सण तोंडावर आला तरी कंपनीकडून संगणक परिचालकांचे मानधन देण्यासाठी कसलीही तत्परता दाखवली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संगणक परिचालकांची दिवाळी अंधारातच साजरी होण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळी पूर्वी मानधन मिळाले नाही तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून संबंधित संगणक परिचालकांकडून देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले तसेच याच निवेदनाची प्रत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाही ई -मेलद्वारे देण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
सीएससी इ – गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लेख्यांचे संगणकीकरण करण्यासाठी संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींकडे प्रशासन आणि संबंधित खाजगी कंपनीकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या संगणक परिचालकांचे मानधन झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.