अंबाजोगाई तालुक्यात ऊसाचे उत्पादन घटणार : दुष्काळी स्थितीचा फटका

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात वाढलेल्या ऊसाच्या क्षेत्राला पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसला असून कारखान्यांची तोड सुरु होईपर्यंत ऊसाचे क्षेत्र जगवण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी, मुडेगाव, धानोरा, आपेगाव, तटबारेगाव, कोपरा, देवळा, सोमनाथ बोरगावसह आदी परिसराची ग्रीनबेल्ट अशी ओळख आहे. धनेगाव तलाव व कोल्हापुरी बंधारे तसेच कालव्यांना पाणी असल्याने बारमाही सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली. बारमाही पीक, एकवेळी लावण केल्यानंतर तीन वर्षे खोडवा घेण्याची सोय, रोगराईचा अभाव, एकरी किमान एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न, गुरांना चाऱ्याची व्यवस्था, कमी व्यवस्थापन अन् उत्पादनाची तसेच उत्पन्नाची खात्री देणारे पीक असल्यामुळे ऊस क्षेत्र वाढले.

मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ऊसाचे पीक कसे जगवावे हा शेतकऱ्यांसमोर महत्वाचा प्रश्न आहे. तालुक्यात 5 हजार 337 हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. 

अपुऱ्या पावसाचा परिणाम : शेतकरी चिंतेत

यंदा निम्म्यापेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी जमिनीत आवश्यक त्या प्रमाणात ओलावा अद्यापही उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. सर्वच साठवण तलावातील पाण्याचा उपसा ऊसासह हंगामी पिकांसाठी सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. दीड महिन्यांपासून तालुक्यात पावसाच्या अभावामुळे ऊस क्षेत्राची वाढ खुंटली आहे. पाण्याची कमी उपलब्धता आणि वीज पुरवठ्यातील अडचणींमुळे हे पीक धोक्यात आले आहे. पावसाळ्याचे पूर्ण दिवसच संपत आल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

बदलत्या नैसर्गिक परिस्थितीत बारमाही सिंचन क्षेत्रासाठी ऊसाची शेती सर्वाधिक शाश्वत पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी स्वीकारली, परंतू, पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांसह पशुधन मोठ्या अडचणीत आले आहे.