टीम AM : ‘सुरुवातीपासूनच, त्यांनी मला कठोर परिश्रम करायला शिकवले आणि इतर कोणावरही अवलंबून न राहता माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवले. ही शिकवण आता माझ्या जीवनाचे सार बनली आहे. त्यांनी मला योग्य मार्ग दाखवला. धन्यवाद बाबा !’ विराट कोहली आपल्या वडिलांची आठवण सांगताना..
दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानावर दिल्ली आणि कर्नाटक यांच्यात रणजी सामना खेळला जात होता. या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाने असे काही केले ज्याने केवळ त्याचाच संघच नाही तर प्रतिस्पर्ध्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. प्रथम खेळताना कर्नाटकने पहिल्या डावात 446 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना पाच विकेट गमावल्या होत्या. दिल्ली संघाची जबाबदारी 18 वर्षीय विराट कोहलीवर आली, जो चांगली फलंदाजी करत होता. पण फॉलोऑन वाचवण्यासाठी दिल्लीला अजून बराच पल्ला गाठायचा होता. दिल्ली संघाची धावसंख्या 103 धावा होती.
पण, त्याच रात्री अचानक विराटचे 54 वर्षीय वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले. आता विराटकडे दोन पर्याय होते. एकतर त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी घरी जावे किंवा दिल्लीला पराभवापासून वाचवण्यासाठी मैदानात उतरावे. विराट कोहलीने आपला डाव खेळण्याचा निर्णय घेतला आणि 49 धावांची खेळी करत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास त्याने शांतपणे पॅड, हातमोजे आणि हेल्मेट काढले आणि तो वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला. वडिलांची शिकवण आणि खेळाप्रती असलेले समर्पणानेच कदाचित त्याला ही ताकद मिळाली आणि आज त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे, हॅपी बर्थडे विराट.