एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप : वाहतूक ठप्प होण्याची शक्यता 

टीम AM : ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवारपासून (दि. 6) राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे. विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.

सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नविन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या दोन प्रमुख मागण्या गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहेत. याशिवाय एसटी महामंडळातील सुमारे 85 टक्के बस नादुरुस्त असल्याने रस्त्यावर चालण्यास अयोग्य आहेत. अनेक गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, त्यामुळे गाड्या रस्त्यावर चालविणे धोक्याचे असून ते प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 48 टक्के महागाई भत्ता दिला आहे. परंतु अद्याप थकबाकी दिलेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, सोमवार सकाळपासून रस्त्यावर एकही एसटी धावणार नाही आणि त्या दिवसाचा पगार मात्र महामंडळाला कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असा इशारा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. यामुळे ऐन दिवाळीत राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले.