टीम AM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधिल असून टिकणारे आरक्षण लवकरच देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी शांततेचे आवाहन देखील केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती
मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी टिकणारे आरक्षण कसे देता येईल याबाबत माहिती दिली. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे असून मराठा आरक्षण शक्य आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल असून राज्यात शांतता राखण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आहे. 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या. शिंदे कमिटीने पहिला अहवाल सादर केला. सरकारने या कमिटीला दोन महिन्याची संधी दिली. डेटा गोळा करण्यासाठी विश्वसनीय संस्थेची मदत घेणार आहे. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या आरक्षणातील त्रूटी दूर करण्यासाठी सरकार काम करतंय. टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची काही प्रतिनिधी आणि उपसमिती यांच्यात बैठक होईल.
मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे राज्यात निघाले. कुठेही गालबोट लागले नाही. परंतू, काही लोकं आता जाळपोळ करत आहेत. यासाठी मराठा समाजाला विनंती करत आहे, टोकाचं पाऊल उचलू नका. कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. मराठा आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी दिले होते. पण दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आम्ही देणार आहोत. कोणाचीही फसवणूक करणार नाही, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.