मराठा आरक्षण : 24 तासात निर्णय घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांचा राजीनामा 

टीम AM : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनामुळे सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढतच चालला आहे. बीड जिल्ह्यातही आरक्षणाप्रश्नी आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच आता राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांंनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (अजित पवार गट) राजेश्वर चव्हाण आणि परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र लिहून पाठविले आहे. 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. उपोषणास्थळी त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भीत येत्या 24 तासात निर्णय घ्यावा, नसता हाच आमचा राजीनामा समजावा. समाजाच्या भावना अधिक तीव्र झालेल्या आहेत. 

सदरच्या प्रश्नावर आपण शासनाकडे आमच्या भावना कळवाव्यात. तसेच जिल्हाभर समाजाच्या याच भावना आहेत. पदाधिकाऱ्यांच्या  देखील याच भावना आहेत. तरी आरक्षणासंदर्भीत तातडीने निर्णय घ्यावा, ही विनंती. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि गोविंद देशमुख यांच्या सहृया आहेत.