गणेश जाधव
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष द्यावे आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येथील उपसरपंच शर्मिला दत्ता जाधव यांनी सादर केले आहे.
घाटनांदूर गाव हे अंबाजोगाई तालुका आणि परळी मतदार संघातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. मर्यादित जलस्रोत आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वर्षांपासून गावात पिण्याच्या तसेच सांडपाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी अनेक वर्षे कसोशीने प्रयत्न करून गावासाठी जलजीवन मिशन सारखी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि या कामासाठी शासनाकडून तब्बल पंधरा ते वीस कोटी रुपयांचा भरगच्च निधीही मंजूर करून आणला आहे. सुमारे एक वर्षांपूर्वी या योजनेचे कामही सुरू झाले. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून कंत्राटदाराकडून थातुरमातुर काम करून सगळी योजनाच घशात घालण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
योजनेअंतर्गत सुरू असलेले पाईपलाईनचे खोदकाम नियमाप्रमाणे होत नसून कंत्राटदार मनमानी कारभार करून गावकरी आणि प्रशासनाची फसवणूक करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची स्थळ पाहणी करावी आणि कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी तसेच या कामाचे कोणत्याही प्रकारचे बिल काढू नयेत. तसे झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही उपसरपंच शर्मिला जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जलजीवन मिशन योजना मंजूर होऊन दोन वर्षे झाली, कार्यारंभ आदेश येऊन वर्ष लोटले आहे. तरीही संबंधित कंत्राटदाराकडून जाणीवपूर्वक मंदगतीने काम सुरू असून वेळकाढूपणा केला जात आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचे हाल होत आहेत. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावकऱ्यांची पाण्यासाठीची वणवण, भटकंती वाढणार आहे, अशी वास्तविकता असतानाही कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट आणि जाणीवपूर्वक मंदगतीने काम सुरू आहे. वरिष्ठांनी लवकरात लवकर स्थळ पाहणी करून संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.