सोशल मीडियावर काही तासातच मिलियन्स व्हयूजचा पाऊस
टीम AM : सुजय वसंत डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी मार्मिक चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा प्रवास अनुभवणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी ‘श्यामची आई’ चित्रपट आपल्या भेटीस येत आहे तो पुन्हा एकदा कृष्णधवल पटाचा ऐतिहासिक अनुभव द्यायला.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या अनुषंगाने त्यावेळचा पेहराव,देहबोली,भाषा आणि संवाद या सगळ्या गोष्टींवर घेतलेली मेहनत श्यामची आई चित्रपटाच्या ट्रेलरमधनं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधून समोर आलेले श्याम आणि त्याच्या आईमधील काही सीन व संवाद प्रत्येकाला भावुक करतीलच पण बरोबरीनं जगण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातील हे तितकंच खरं. खोडकर श्यामचे साने गुरुजी बनण्यामागे त्यांच्या आईचा असलेला संघर्ष आणि जिद्द ‘श्यामची आई’ चित्रपटातून अतिशय रंजकपणे दाखवण्यात आलं आहे. आणि कदाचित म्हणूनच ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच त्याने मिलियन्स व्हयूजचा टप्पा पार केला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता जोरदार वाढली होती, आता ट्रेलर पाहून प्रेक्षक 10 नोव्हेंबर या रिलीज डेटची वाट पाहू लागले आहेत.
बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब, अजय, अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.
अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.