टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली होती. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अंबाजोगाई तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाचे पार्थीव आंदोलनाच्या ठिकाणी ठेवत या आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने वाहतूकीच्या मार्गात बदल केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
‘अंत्यविधी’ करणार नाहीत : कुटुंबीयांची भूमिका
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणाचा अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली होती. जोपर्यंत आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नाही, तो पर्यंत अंत्यविधी करणार नाहीत, अशी माहिती उपस्थितांनी दिली. दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासनाने याची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संवाद चालू असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

गिरवली येथे अंत्यसंस्कार..
मराठा बांधवांकडून काशीद कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, काशीद कुटुंबाला 25 लाखांची मदत करण्यात यावी, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तरंगे आणि पोलीस निरीक्षक घोळवे हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. अखेर प्रशासन आणि मराठा बांधवांच्या समन्वयातून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी होकार देण्यात आला. मात्र, आमचे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तब्बल 18 तासानंतर आत्महत्या केलेल्या काशीद यांच्यावर त्यांच्या गावी गिरवली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील तीन तरुणांनी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.