मराठा आरक्षण : तरुणाची आत्महत्या, अंबाजोगाईत मराठा बांधवांचे ‘ठिय्या’ आंदोलन

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अंबाजोगाई तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक झाला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले आहे. 

दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाचे पार्थीव आंदोलनाच्या ठिकाणी ठेवले असून या आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने वाहतूकीच्या मार्गात बदल केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. 

‘अंत्यविधी’ करणार नाहीत : कुटुंबीयांची भूमिका

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणाचा अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नाही, तो पर्यंत अंत्यविधी करणार नाहीत, अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासनाने याची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संवाद चालू असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.