टीम AM : ठाणे, नांदेड व छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णांचे मृत्यू झाल्याने शासनावर टीका होऊ लागताच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 34 जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पावले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत शिंदे यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरती याबाबत सूचना केल्या. बैठकीला आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. नवीन सुविधायुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबतचा आराखडा पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने तयार करावा आणि 2035 पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे एक सर्वंकष ‘धोरण (व्हिजन)’ तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
औषधांचा तुटवडा नको !
जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी वेळ न गमावता आपापल्या ठिकाणी रुग्णालयांत लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे दरपत्रकानुसार तत्काळ खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘या’ दिल्या सूचना
’25 जिल्ह्यांमध्ये नवी अद्ययावत जिल्हा रुग्णालये उभारणार
‘वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन
’14 जिल्ह्यातील महिलांच्या रुग्णालयांचे बळकटीकरण
‘मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा
‘प्राथमिक उपकेंद्रे, उप जिल्हा रुग्णालये सक्षम करणे
‘आरोग्य खर्चामध्ये भरीव वाढ – सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीला वेग
‘वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवी परिमंडळे निर्माण करण्याचे निर्देश, आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आली पाहिजे. वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री