राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना : मुलींना करणार लखपती

टीम AM : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. 

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र, आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.