धक्कादायक : नांदेडनंतर आता ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

टीम AM : मराठवाड्यातील नांदेडची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 नवजात बालकं होती. आता छत्रपती संभाजीनगरच्या ‘घाटी’ रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा कारभार नेमका कसा चालतो ? तिथे आरोग्य सुविधा कशा आहेत ? किती डॉक्टर्स आहेत ? रुग्णसंख्या किती ? नेमकी समस्या काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

‘घाटी’ रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठ आणि महत्त्वाच रुग्णालय आहे. 12 ते 14 जिल्हे या रुग्णालयावर अवलंबून आहेत. दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात.

‘घाटी’ रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचल आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशी माहिती आहे. 

दरम्यान, ‘घाटी’ रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या एका रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. शासकीय रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू का होतायत ? यामागे काय कारण आहेत ? याचा शोध घेण महत्त्वाच आहे.