राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
टीम AM : वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज (दि. 02) ऑक्टोबर रोजी दुपारी अंबाजोगाई शहरात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करावा, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करावे, यासह विविध मागण्यांसाठी हा ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणतून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
काय म्हटलंय निवेदनात…
वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, देशात व राज्यात नितीहिन, भ्रष्ट, देश विक्री करू पाहणारे तथा देशात आराजकता व गुलामी व्यवस्था निर्माण करू पाहणारे तथा भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधानाला बगल देऊन मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बहुजन समाजाच्या लेकरांची शिक्षणातून तसेच शासकिय नोकऱ्यांतून, त्याचबरोबर घटनात्मक आरक्षणाच्या तरतूदीला बगल देता यावी व बहुजन समाजाला गुलाम करता यावे, यासाठी राज्यात खाजगीकरण कंत्राटी पद्धतीने आणण्याचा घाट घातलेला आहे. जो लोकशाहीला, देशाच्या एकात्मतेला, स्थिरतेला, घातक व बाधक ठरणारा आहे. तरी वंचित बहुजन आघाडी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छित आहे की, लोकशाही व घटनात्मक तरतुदींची अमलबजावनी करावी व खाजगीकरण, कंत्राटी पद्धतीने भरतीचा शासन निर्णय रद्द करावा, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करावे यासह अन्य मागण्यां निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील), बीड जिल्हा युवा प्रभारी अमोल लांडगे, सम्यक राज्य उपाध्यक्ष प्रशांत बोराडे, सुधाताई जोगदंड, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, शहराध्यक्ष गोविंद मस्के, अमोल पौळे, नितीन सरवदे, ‘सम्यक’ चे संकेत हातागळे, स्वप्नील सोनवणे, नितीन गोरे, निखिल भागवत, लखन वैद्य, शुभम कसबे यांच्यासह ‘वंचित’ चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.