भीषण अपघात : भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं, चौघांचा मृत्यू

टीम AM : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीक वडनेर भोलजी या गावाजवळ मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं. हे सर्व मजूर महामार्गाच्या बाजूला झोपलेले होते. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात सहा मजूर हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून या सर्वांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी साडेपाच वाजता हे सर्व मजूर झोपलेले असताना यांना भरधाव ट्रकने चिरडलं. तात्काळ स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या सर्वांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.