अभिनंदनीय : बीडच्या अविनाश साबळेची ‘सुवर्ण धाव’, सुवर्ण पदकाला गवसणी

टीम AM : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये इतिहास रचला आहे. त्याने या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून भारताच्या खात्यात 12 व्या सुवर्ण पदकाची भर घातली आहे.

अविनाश साबळे यानं आजच्या स्पर्धेपूर्वी यंदाच्या हगांमातील हाँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं. मी राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी धावत नसून  हाँगझोऊ मधील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचं तो म्हणाला होता. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी धावणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलं असून चांगली कामगिरी करुन सुवर्णपदकावर नाव कोरणार असा निर्धार त्याने केला होता. 

अविनाश मूळचा बीड जिल्ह्यातला 

अविनाश साबळे महाराष्ट्रातील मूळचा बीडचा आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत आहे. 12 वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आता चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. 12 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्यपदकांसह भारताने आतापर्यंत 44 पदकं मिळवली आहेत.